आजकाल

म्हणायला तर तू हाकेच्या अंतरावर असतोस ….  पण तरी अंतर तर जाणवतंच ना

रात्री गादीवर पडल्या पडल्या खिडकीतून आकाश पाहताना डोळ्यात पाणी तर येतंच ना

मुठीत पकडलेले काही क्षण आणि काळजात रुतणारी तुझी आठवण

मोजून मापून तोललेल्या आयुष्यात तुझी म्हणून माझ्याजवळ एवढीच साठवण

हिशोबात बसले नाहीत म्हणून तू सोडून दिलेले आपले ते दिवसरात्र

काम, घर आणि परत कामाच्या गडबडीत राहून गेले विषय सगळे मात्र

आता नको उद्या बोलू, जाऊ दे परत कधी तरी भेटू, यापेक्षा वेगळी कारणंच कुठे असतात

तुझ्या आणि माझ्या आयुष्यात आता एकमेकांना भेटायच्या वेळाच उरलेल्या नसतात

माझा तू आणि तुझी मी हे आता दिवसभर मनात आठवायचं असतं

पण तुझ्यातल्या मला आणि माझ्यातला तुला भेटायला फक्त स्वप्नच उरलेलं असतं

Advertisements
Posted in Uncategorized | 2 प्रतिक्रिया

समांतर

आपल्याच चुकांचे वेडेवाकडे घाव, सलत राहतात आणि मग जखमा होतात.
चिघळत जातात दिवसेंदिवस…
दुखतात,  कधी खुपतात आणि बोचतात
सुखाची झळ सोसत नाही स्वतलाच, मग दुखाची कशी सोसेल
एकमेकांत रुतून बसलेल्या काटेरी भावना, बोथट झाल्या तरी रक्त काढतात..
 
नुसत्या शब्दांची तीक्ष्ण धार कापून जाते, मनाची लक्तरं दिसू लागतात
वेशीवरती टांगलेली, उघड्यावर लटकलेली..
आणि रोज रोज लिलावात निघणारी
ती दिसतात सगळ्यांना पण कोणाच्या मनापर्यंत पोहोचत नाहीत
सगळ संपल्याची जाणीव होते पण मेंदूपर्यंत जायची राहते
 
संवाद संपतात सारे, जगाशी आणि स्वतःशी
हरून जातो, एकटे पडतो..
गरज असते एका भ्रमाची, सत्याला हरवण्याची
पण त्यासाठी आपण जगतोय हा भ्रम केवळ ठरत नाही
आणि जगण्यासाठी श्वास सुरु आहे हाच पुरावा पुरेसा ठरत नाही.
 
एकाच वर्तुळाच्या परिघावरून आपण धावत राहतो

सतत केंद्राबिंदुला समांतर….
पण धावून धावून सुद्धा तिथपर्यंत कधीच पोहोचत नाही
Posted in Uncategorized | 9 प्रतिक्रिया

जागा

 डोळे किलकिले करून आजूबाजूला पाहिलं मी, अरे हे तर सगळ नवीन वाटतय, “हाआSS” अजून एक जांभई, खूप झोप आलीये, पण हे सगळ काय आहे,
हाताची मुठ उघडायचीये, पण बोट कशी हलवावीत माहित नाही. आजूबाजूला सगळ पांढर दिसतंय आणि मग निपचित शांतता.
मधूनच कोणीतरी माझ्यासारख रडतंय वाटत, आणि मग ती येतेय, तिचे पण कपडे तसेच पांढरे, कोणत्याही भावनेचा लवलेश नसलेले, मला पटकन उचलून घेतलंय आणि चाललीये बाहेर… कुठे माहित नाही.
आता कोणाचा तरी स्पर्श, खूप ओळखीचा, एकदम माझ्यातला आहे असा. तिच्या कुशीत खूप शांत वाटतंय, उबदार आणि सुरक्षित. माझ्या इवल्याश्या बोटांना तिनी घट्ट पकडलंय आणि तिच्या गालावरचे दोन थेंब ओघळून माझ्या गालावर पडलेत. तिचे मऊ मऊ हात, ते हळुवार माझा चेहरा कुरवाळण, असा वाटतय मी हिच्यातलीच एक आहे. हिचाच जीव आहे माझ्यात.  पण मग मला ओढून का नेतायत हिच्यापासून दूर? तीच रडण पाहवत नाहीये मला, आणि माझ्या डोळ्यातले अश्रू कोणाला दिसत नाहीयेत. 
एक बोट कोणाच तरी तोंडात आहे. तो विचित्र वास आणि ती घाण चव, आणि मग कसलीच संवेदना नाही, कसलीच जाणीव नाही. एक बधीर जड झोप डोळ्यांवर….
 
परत एकदा डोळे उघडावेसे वाटतायत, पण काहीतरी वेगळच जाणवतंय, मंदावलेल्या पापण्या बहुतेक… का हातावर फिरणारं काहीतरी विचित्र?  
कोणाचे तरी श्वास चेहेरयाजवळ आणि मग घाण वास… हळूच डोळे उघडले तर आजूबाजूला खूप काहीतरी गिळगिळीत. घाणेरड.. आणि तो शेजारी उभा. जीभ बाहेर काढून आपले दात दाखवत… मागे काहीतरी हलतंय त्याच्या आणि तो जिभल्या चाटतोय.
आईSगं पाठीखाली काहीतरी चावलय. आणि वरून त्यांनी त्याच्या दातांनी एक तुकडा तोडलाय पायाचा माझ्या.
अचानक कोणीतरी अंगावर काहीतरी फेकल, घाण वासाच आणि ओलं. आजूबाजूला सगळा कचरा पडलाय. आणि हाताला सगळीकडे छोट छोट लाल लाल काहीतरी चावतय मला, पण रडता येईना, तोंडात बोळाआहे नं माझ्या….पण खूप दुखतंय. लाल रक्त वाहतंय.
 
मगाशी तर सगळ पांढर होतं नं माझ्याशेजारी. उबदार स्पर्श, आपल कोणीतरी असल्याची जाणीव..
आणि आता आजूबाजूला सगळ लाल आणि घाणेरड. सगळीकडून तोडले जाणारे लचके, गुदमरणारा श्वास
 
नक्की माझी जागा कोणती होती, तिच्या कुशीत सुखाचा श्वास घेताना? का इथे दबलेल्या हुंदक्यांमध्ये दम तोडताना?
आणि हे सगळ का?………… फक्त मी एक मुलगी म्हणून……….
Posted in Uncategorized | 9 प्रतिक्रिया

वाट

 तिला आज बिलकुल चैन पडत नव्हती. office च काम पटापट संपवून केंव्हाची घड्याळ पाहत बसली होती, तीन मिनिटात अकराव्यांदा तरी तिची नजर त्या घड्याळाकडे गेली असेल. “शी बाबा, अजून अर्धा तास, कधी संपणार कोण जाणे? हि वेळ न  नको तेंव्हा पळत असते आणि आज जाता जाईना”. पुन्हा एकदा चौफेर नजर टाकून तिनं पाहून घेतलं बोस नाहीये ना, नाही तर आपल्याला नुसत बसलेल बघून काम द्यायचा. शेजारी कोणाच आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून तिला हायस वाटल, खुर्चीवर रेलून मागे मान टाकून तिचे विचार सुरु झाले.
 
आज 1 महिना झाला, आपण त्याच्याशी बोललो नाही, किती फोन आले त्याचे, किती message , किती mails  .. पण आपण एकाचं पण उत्तर नाही दिलं. खरचं वेडा आहे तो, किती hurt होत असेल प्रत्येक वेळी तरी करून करून, तरी प्रत्येक वेळी नव्यानी try करतो. खर मला राग आला कि कंट्रोल होतं नाही पण राग गेल्यावर वाईट वाटत राहत कि मी ह्याच्याशी अशी का वागते. ह्याला आपली किती गरज आहे, केवढ प्रेम आहे, सहनशक्ती आहे. आपण का असे, आपल्याला का नाही अशी याची गरज. कसं आपण ह्याच्या पासून दूर राहतो दिवसदिवस
पण चूक सुद्धा हाच करतो. दोन दिवस तर गेले होते बाहेर मैत्रिणींसोबत, त्यातून तिथ range नाही मोबाईलला. मग कशी ह्याला फोन करणार? आणि
घरी येते ना येते तोच घरात पाहुणे, कोण कुठले नातेवाईक असतात, एक सुद्धा धड आठवत नाही, पण तुच्या पाहुणचार तर करावाच लागतो ना. इतक दमून पण ह्याला भेटले. तर लगेच चिडला, तुला वेळच देता येत नाही, तुला किंमतच उरली नाही, हेच का तुझ प्रेम. मला इतका राग आला ना. एक तर इतक्या दिवसांनी भेटलो, आणि परत भांडायचं. नुअस्ता वैताग आणि चिडचिड झाली माझी.
मग रागातच म्हणाले, नाहीच उरलं जा प्रेम. आणि त्या नंतर अजून बोलले नाही…
वेडा, रोज माझी नेहमीच्या stop वर वाट पाहत असेल, पण मी गाडीवरून यायला लागले मुद्दामून. पण आता हळूहळू वाटतय बस झाला राग, प्रेम करते ना, मग मी पण थोड adjust केल पाहिजे ना. सगळ माझ्या मनासारख तर होत, मग कधी कधी त्याच पण ऐकल पाहिजे ना..वेडीच आहे मी पण, कधी कधी खूपच त्रास देते. आज त्याला भेटून छान surprise देते आणि sorry पण म्हणते.
 
तिनी डोळे उघडून घड्याळ पाहिलं, ६ ला ५ मिनिट कमी होते, तिनी पटकन पर्स उचलली आणि पार्किंगकडे पळाली. १५ मिनिटात त्यांचा नेहमीचा stop आला. अजून त्याचा काही पत्ता नव्हता.  मनात खट्टू झाली ती, तिला वाटल होत तो तिथच असेल बाईक वर तिची वाट पाहत उभा, आणि तिला पाहून त्याच नेहमीच आभाळभर हसू भरून येईल दोघांच्या मध्ये.
पण तो नाहीच आहे तिथ. शेजारी गाडी लावून ती बसून राहिली… दहा मिनिट झाले, पंधरा मिनिट, इतका वेळो कुठे आहे हा. ह्याच office तर लवकर सुटत, नवीनच जॉईन झालाय ना मग जास्त काम नसत सध्या त्याला. ती ओढणी बोलावर गुंडाळत स्वताशीच बोलत बसली, आता काय करायचं, कोणाला विचारू, त्याचे मित्र तिला आवडत नाहीत, खूप टवाळक्या करतात, हा कसं राहतो त्यांच्यात देव जाणे. एकाचाही number नाही आपल्याकडे. आणि ओफ्फिचे नवीन, सो तिथला number पण नाही माहित.
खूप काम आल वाटत त्याला, फोन पण उचलेना. किती वेळा try केला, रिंग वाजून वाजून बंद पडतीये, का मला शिक्षा देतोय मी त्याला वाट पाहायला लावली म्हणून. छे, असा काही करायचा तो विचार पण नाही करणार, खूपच साधे आहे तो, सगळ्यांपासून वेगळा. म्हणून तर एका भेटीत प्रेमात पडले त्याच्या. पण मग काय झालं असेल..
आता तर पाऊण तास झालाय, ती समोरची दोन पोर सारखी चक्कर मारून जातायत, कुठे आहे हा यार? काय चाललय याच?. का याच पण प्रेम संपल? मी दूर राहिले महिनाभर तर ह्याच मन बदललं? मला तर म्हणायचा कि आयुष्भर तुझी वाट पाहीन. आणि १० दिवसातच भूत उतरलं का काय, कालच  १० वेळा तरी फोन आला होता आणि मी उचललाच नाही. पण त्यानंतर तर एकही mail नाही, message नाही, खरचं बदलला वाटत हा..
का ह्यांनी पण ठरवलंय लांब राहायचं, तरीच माझ्या msg ला reply देईना.
दोन तास झाले हा, आता मात्र खूप झाल ह्याच, ह्याला काय वाटत मी आयुष्यभर वाट बघीन का काय? स्वत तर मोठमोठ्या बाता मारायचा, मी जन्मोजन्मी तुझाच राहीन, तुझी वाट पाहीन, तुझ्या शिवाय कुठे जाऊ? आणि आता बघा, मी वाट पाहून पाहून वैतागले इथे, जाणारे येणारे प्रत्येक जन वळून वळून बघतायत, आईचा पण दोन वेळा फोन येऊन गेला. आज हयान सगळी हद्द पार केलीये. मी माझा राग विसरून ह्याच्याकडे आले आणि ह्याला काही किंमतच नाही. मी मूर्ख आहे, मला वाटत होतं कि हा आजही इथेच उभा असेल. तो गेला असेल आपल्या मार्गांनी, त्याला पण नसेल उरली आता माझी गरज.
जाऊ दे, जा खड्ड्यात, आयुष्यात कधी परत येते का बघ ह्याच्याकडे, ३ तासापासून वेड्यासारखी वाट पहिली, फोन केले, msg केले, पण ह्याचा कहिओ response च नाही.मला आधीच कळायला पाहिजे होते, काही साधसारण नसता कोणी, प्रत्येक जन स्वार्थी असतो आणि वेळ आली कि स्वताची कातडीबचाव मोहीम आधी सुरु करतो. बास्स, छान धडा शिकले मी आज आयुष्यात, परत कधी कोणावर इतकी विश्वास नाही ठेवणार. आणि आयुष्यात परत कधी ह्याच नाव नाही घेणार. तिनी गाडी start केली आणि  एकही सेकंद वाट न बघता निघून गेली.
 
समोर दोन पोर बसली होती, पहिला दुसऱ्याला म्हणाला, आज पण हि पोरगी इथे ३ तास बसली होती. काही कळत नाही राव रोज काय करते हि एकटीच बसून?
दुसरा म्हणला, अरे तुला माहित नाही का? १ महिन्यापूर्वी इथे एका पोराचा accident झालं होता ना, त्याची हि item आहे. म्हणतात कि तो मरायच्या आधी ह्याचं भांडण झाल होता आणि तो रोज हिची वाट पहायचा इथेच, पण हि कधी आली नाही. त्याच जागी उभा राहून गेला बिचारा.. आणि त्या दिवसापासून हि रोज इथे येते. काय माहित आता हि त्याची वाट का बघते? ………………

 

Posted in Uncategorized | 17 प्रतिक्रिया

मला मराठी बोलता येत…

मला मराठी बोलता येत…
 
हे वाक्य माझा नाही… म्हणजे गैरसमज करू नका, मला तर मराठी बोलता येताच. पण हे वाक्य माझ नाहीये. हे वाक्य आहे माझ्या मध्यप्रदेश मधून आलेल्या अगदी जिवलग मैत्रिणीच.
 
आजकाल जिथ तिथ मराठीची हेळसांड पाहतो, महाराष्ट्रीयन असून पण कितीतरी जणांना  मराठी बोलायची लाज वाटे. आपलं बाळ बालवाडीत असल्यापासून कस इंग्लिश मध्ये बोलत याचा अभिमान असणारे पालक पण पाहिलेत मी. इंग्लिश आजच्या जगात गरजेची भाषा आहे मान्य. एवढच नाही तर रोजच्या वापरत इंग्लिश शब्द पण मध्ये मध्ये घालण सुद्धा मान्य. माझ मराठी देखील इतकं  इंग्लिश वर्ज्य नाहीये. पण याचा अर्थ मला माझ्या भाषेचा अभिमान नाही असा नाही.
 
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी पाहिलेले छोटे छोटे अनुभव खूप सुख देतात. हि माझी MP ची मैत्रीण. अगदी मुरलेली भोपाळकर, गेली ८ वर्ष ती पुण्यात आहे, college मग आता नोकरी असा सगळ इथेच झालाय. तिला मराठी बोलायला फार आवडत. इतके वर्ष महाराष्ट्रात राहून तिला मराठीची गोडीच लागलीये. सतत मला विचारात असते कि ह्याला मराठीत काय म्हणू. त्याला कस बोलू. तिला जो कोणी महरश्त्रिअन दिसेल त्याच्याशी आवर्जून मराठीतून बोलते.
 
अशीच अजून एक मैत्रीण ती आहे काश्मिरी. college मध्ये होती माझ्यापेक्षा २ वर्ष पुढे. तिला मराठीच खूप कौतुक होत.  आपले उच्चार, आपले शब्द फार आवडायचे तिला. तिचा सगळ्यात आवडता शब्द होता “भयंकर”, म्हण्यची तो शब्द उच्चारतानाच मला भीती वाटायला लागते. 🙂  मग एक मित्र होता माझा, राजस्थान हून आलेला.तो पण college मध्ये माझ्याच वर्गात होता. त्यांनी तर मराठी शिकण्यासाठी आपल्या रूम पार्टनरचे १ महिना कपडे धुतले होते. फक्त एका अटीवर कि रोज त्याला १ तास मराठी शिकवायचं..
 
आता ह्यानंतर जर अशी लोक पहिली कि जे मराठीची लाज बाळगतात, ज्यांना चारचौघांमध्ये मराठी बोलण हा कमीपण वाटतो. त्यांना तर महाराष्ट्रातून हलकलून अश्या ठिकाणी पाठवावं, जिथ त्यांना मराठीचा “म” पण ऐकायला मिळणार नाही वर्षानुवर्ष……….
Posted in Uncategorized | 10 प्रतिक्रिया

बाबाचा वाढदिवस

आज बाबाचा वाढदिवस, खर तर भारतात तो आता काल झालाय. पण माझ्यासाठी आजच आहे.
 
पहिल्यांदा बाबाच्या वाढदिवसाला मी लांब आहे. म्हणजे दर वर्षी बाबांचा वाढदिवस असा काही वेगळ नसायचा. मोठ्यांचा काय वाढदिवस साजरा करायचा असा आमच्या आईच मत. त्यामुळे आईबाबाच्या वाढदिवसाला घरीच cake करणं, काहीतरी छान जेवायला करणं आणि अगदीच अति म्हणजे बाहेर जेवायला जाण ह्यापेक्षा जास्त काही नसत. पण ह्या वेळी मी एकटी इतकी लांब. काल रात्री बाबाला शुभेच्चा देताना त्याचा आवाज कातर झाला होता क्षणभर आणि माझाही हुंदका दाटून आला होता.
 
अश्यातच नचिकेतची हि पोस्ट वाचली. आईशप्पथ, हृदयात कालवाकालव होण काय असतं ना ते अश्यावेळी कळत.
 
डोक्यात एकच विचार चालू आहे तेव्हापासून, लहानपणापासून मी बाबाची लाडकी, पण मोठं होत गेले तशीतशी आईच्या जास्त जवळ आले. कदाचित बाबा सतत बदली होऊन ह्या त्या गावी असायचे, किंवा मोठ होताना आई जवळची होते म्हणून पण असेल. हे त्याच्यापासून दूर होण आणि आईजवळ येण जाणवत असेल का बाबाला?
 
मला अजूनही आठवत, दहावीच्या result च्या वेळी मला ९०% पडले म्हणून आईनी आणि मी आनंदाश्रुंचे पाट वाहिले होते, पण मन फिरवून शर्टच्या बाहीला हळूच डोळे पुसणारा बाबा मला आजही आठवतो. मी engineering admission घेताना आई तयार नव्हती, फी कुठून भरायची इतकी हेच तिला कळत नव्हत. पण बाबानी आईशी अक्षरशः भांडून मला admission घेऊन दिली. मग प्रत्येक वेळी result लागला कि अभिमानाने आईला म्हणायचा बघ मी म्हणाल नव्हत तुला. ज्या दिवशी campus interview होता त्यादिवशी सकाळी मला म्हणाला होते, tension  घेऊ नको तुझ सगळ नीट होईल माझा विश्वास आहे.  त्याच दिवशी job मिळाला.
 
संध्याकाळी तो यायच्या वेळी मी मंदिरात गेले होते, मंदिरातून येताना दारातच त्याचा कापरा आवाज ऐकू आला ” मी एका वर्षात जेवढ कमावत असेल तितकं माझी पोरगी ३ महिन्यात कमवून आणेल आता, बघ मी म्हणाल नव्हत तुला”. त्या दिवशी माझ्याकडे बोलायला शब्द उरले नाहीत. इतका अभिमान मला माझा पण कधी वाटला नसेल, तितका त्याला वाटत होता. आपली पोरगी आपल्यापेक्षा जास्त कमावते हे त्याच्यासाठी अप्रूप होत आणि इथे पैश्यासाठी जीव घेणारे लोक बघतो रोज आपण.
 
Deccan वरून  पार्वती पायथ्याला जायला कोणत्या number ची बस पकडू असं दहा वेळा phone करून विचारणारी त्याची लेक,  US ला येताना airport वर सामान कुठे चेक इन करायचं, कस जायचं हे त्याला समजवून सांगत होती. त्या वेळी काय वाटल असेल त्याला? आपली छोटीशी मुलगी मोठी झाल्याच समाधान का ती छोटी न राहिल्याच दुःख….
Posted in Uncategorized | 9 प्रतिक्रिया

जादू कि झपकी

मंद दिवे, AC चा सुखावणारा झोत, एका लयीत अन सुरात बाहेर येणारे शब्द, पडद्यावरची हलणारी चित्र, तोंडात अजूनही मगाशी खालेल्या मस्त जेवणाची चव, हळूहळू जादावेलेल्या पापण्या, आणि मग अचानक एका आवाज,त्याच्या हातातून गळून पडणाऱ्या पेनचा…. क्षणात डोळे खाडकन उघडतात आणि त्या अंधुक प्रकाशातहि मीटिंग मधले आख्खं पब्लिक त्याच्याकडे पाहत असत, छोट्याश्या डुलकीची ऐशी कि तैशी……
 
दुपारची वेळ, शेजारीपाजारी सतत कोणाची तरी वर्दळ, मधूनच ऐकू येणारी कोणाची तरी खळखळ, तिच्या डोळ्यासमोर मात्र सकाळी चोळून चोळून घालवलेली झोप, मस्त लोळत पडणारा नवरा, इच्छा नसताना बंद केलेला गजर…. कितीतरी दिवसांची साठलेली सुखाची झोप हळूहळू डोळ्यांमध्ये साचू लागते, डोळे जडावतात तोच, समोरच्या तबले वर आपटलेली file न समोर बोस चा चेहरा, एक छोटीशी डुलकी…..
 
टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता, मधून येणारा बुटांचा आवाज, table वर मारलेली एखादी छडी, वेळ संपत येतोय हे सांगणारी मधूनच एखादी बेल, समोर कोरा paper , आणि मनात मात्र पहाटे क्लासला जाण्यासाठी निग्रहानी बाजूला सारलेली झोप, क्लासमध्ये लक्ष लागावं म्हणून थंडीत पण गार पाण्यानी केलेली अंघोळ, सर शिकवतांना हाताला चिमटे काढून काढून स्वतःला जाग ठेवणं, ज्या विषयासाठी जीवापाड मेहनत घेतोय त्याच विषयाचा paper लिहिताना झोप अनावर होतीये… अचानक जोरात बेल वाजू लागते आणि काही कळायच्या आत paper हातातून गायब झालेला असतो, एक शांत डुलकी……
 
समोर गाडी गाडी खेळत बसलेला सोनुला, TV वर बारीक आवाजात रोजचीच बोरिंग serial , रस्त्यावरून मधूनच येणारे गाड्यांचे आवाज, पण तिला आठवते ती अर्धवट राहिलेली झोप, मध्यरात्री सोनूच्या रडण्यानी आलेली जाग, मग त्याला झोप येईना म्हणून जागून काढलेले ४ तास, त्याला झोपवून आडव होतंय तोच झालेला गजर… मग सकाळी स्वयंपाकाची घाई, ह्याच्या ऑफिसची तयारी ह्यात विसरून गेलेली झोप डोळ्यावर चढू लागते, एक सेकंद मिटलेले डोळे खटकन उघडतात तर तिचा सोनुला पिठाचा अख्खा डबा घेऊन बाहेरच्या खोलीत अंघोळ करतोय, एक अर्धवट डुलकी…..
 
सकाळची local मधली तुफान गर्दी, सगळीकडून येणारे घामाचे वास आणि चिकट स्पर्श, मानेवरचा टाय सैल करून हुश्श करताना त्याला आठवते ती काळ रविवारी काढलेली सकाळची निवांत झोप, आईच्या हातचा मस्त उपमा, मग दुपारी लोळून पाहिलेला picture , संध्याकाळी तिच्या बरोबर मनसोक्त भटकण, रात्री मित्रांशी chatting करताना अचानक आठवलेली office ची file , मग सगळ सोडून रात्रभर बसून टॅली केलेले accounts , हिशोब लागेना म्हणून पहाटे केलेली डोकेफोड, मग अंघोळ करताना आठवेली आणि breakfast करता करता सुधारलेली चूक… हळूच कुठून तरी गार वाऱ्याची झुळूक येते, आणि तो क्षणभर डोळे मिटतो, अचानक समोर हालचाल जाणवते, बघतो तर अगदी समोरची seat रिकामी होऊन कोणीतरी बळकावलेली., आता उभा राहा ४० minute , एक महागात पडलेली डुलकी….
 
 2×2 च cubicle , PC वरच document डोळे ताणून ताणून वाचणारी ती, मधूनच एखादा मागून पास होतो, कोणाच्या तरी डेस्क वाचा फोने वाजतो, बाकी सगळ शांतच, मग त्या document ची अक्षर दिसेनाशी होतात, आणि दिसतं ते आज कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं म्हणून २ पर्यंत जागून केलेलं कोडींग, मग डोक दुखत म्हणून सारखी येणारी जाग, सकाळी gym ला जायच्या निश्चयानी हट्टानी बाजूला सारलेली दुलई, मग घरी येईन पटापट आवरणं, कंपनी बस पकडायला केलेली धावपळ, त्यातून पण status मीटिंग मध्ये लागलेली वाट… हळूहळू मान एका side ला कलायला लागते आणि आता डेस्कवर डोक ठेवणार तोच शेजारचा phone खाणाणतो आणि Manager विचारतो can you drop in for a minute ?, एक चोरून काढलेली डुलकी…..
 
किती ह्या डुलकीचे आकार आणि प्रकार पण येते मात्र हमखास नको त्या वेळी, एक सेकंद येणारी डुलकी किती तरी तासाच्या झोपेपेक्षा मोलाची असते आणि एकदम ताजीतवानी करून जाते.
 

 

Posted in Uncategorized | 8 प्रतिक्रिया